महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | आधीच दर आणि उत्पादकतेने त्रासलेल्या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याना यंदा अस्मानी संकटाने चांगलेच छळले आहे. सोलापूरसह मराठवाडा, नाशिक, अहिल्यानगरच्या ऊस पट्ट्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे पीक अद्यापही पाण्यात आहे. राज्यातील विविध नदीकाठांवरील क्षेत्रात पुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे चालू हंगामात १०० लाख टन ऊस कमी मिळण्याची शक्यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.
गारपीट वगळता मोठ्या पावसातही किमान नुकसान होणारे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. मात्र यंदा बहुतांश मराठवाडा आणि काही प्रमाणात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात यंदाच्या अतिवृष्टीने ऊस पीक चांगले प्रभावित झाले आहे. राज्यात सीना, भीमा, शिवनी, सिंदफणा, बिंदुसारा, लेंडी, आसना, प्रवरा, गोदावरी, तेरणा, मांजरा, मन्याड, पूर्णा, दुधना तसेच गिरणा आदी नद्यांच्या काठची ऊसशेती अंशतः ते पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे.
पावसाचे दिवस वाढल्यामुळे ऊस पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. परिणामी अनेक भागांत उसाची वाढ खुंटली असून रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातून उत्पादकतेत प्रति हेक्टरी आठ टनाने घट येऊ शकेल, अशी साखर उद्योगाची माहिती आहे. उत्पादकतेचा अंदाज प्रति हेक्टरी ८२ टनांचा होता. परंतु आता ती ७४ टनांच्या आसपास राहील, असे वाटते. आताचे चित्र बघता राज्यभराच गाळपाला १०९० ते ११०० लाख टन ऊस मिळण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे म्हणणे आहे.