महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | पोलिसांनी कुख्यात बंडू आंदेकर, नीलेश घायवळ आणि रिझवान ऊर्फ टिपू पठाण यांच्या बेकायदा मालमत्तांवर जप्ती, अतिक्रमणांवरील कारवाया आणि बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान पोलिसांनी कोथरूड, कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, सहकारनगर, कात्रज, येरवड्यासह इतर भागातील सराईत टोळ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
आंदेकर टोळीने आयुष कोमकर या तरुणाचा गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर नीलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी कोथरूडमध्ये एका तरुणावर जीवघेणा गोळीबार केला. यापूर्वी कोंढव्यात गुंड टिपू पठाणने महिलेची जागा बळकावल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. कुख्यात टोळ्यांतील सराईत गुंडांकडून वाहनांची तोडफोड आणि धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई वाढवली आहे.
तरीही गुंडगिरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुंड टिपू पठाण याला मकोका आणि इतर गंभीर गुन्ह्यांत अटक केली आहे. सय्यदनगर येथील ख्वाजा मंजिल परिसरात त्याने उभारलेले अनधिकृत कार्यालय आणि बांधकामे महापालिकेसह काळेपडळ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाडण्यात आली. कोथरूड, हडपसर, बिबवेवाडी, कात्रज आणि येरवडा परिसरातील गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांच्या मालमत्ता, बँक व्यवहार आणि अतिक्रमणांची चौकशी सुरू आहे.
Pune Police
Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?
पोलिस आयुक्तांनी सर्व सक्रिय गुन्हेगारांना हजर करण्याचे फर्मान काढल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांचे उजवे हात समजल्या जाणाऱ्यांकडूनच गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकही कारवाईबाबत संभ्रमावस्थेत आहेत.
बंडू आंदेकरची आर्थिक कोंडी
‘मकोका’ कारवाईनंतर बंडू आंदेकरच्या घरातून ७७ तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड असा ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर २७ बँक खाती गोठविण्यात आली. गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील मासेविक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण करून १२ वर्षे प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या आंदेकर टोळीवर फरासखाना पोलिसांनी संघटितरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आठवडाभरात दोन टप्प्यांत कारवाई करून ८७५ चौरस फूट पक्के बांधकाम व ६७५ चौरस फूट पत्राशेड पाडण्यात आले. संत कबीर चौक आणि मासळी बाजार परिसरातील डझनभर स्टॉल्स, टपऱ्याही हटविण्यात आल्या आहेत.
घायवळची बँक खाती गोठवली
स्वित्झर्लंडला पळून गेलेल्या नीलेश घायवळ आणि कुटुंबीयांच्या १० बँक खात्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्या खात्यांत ३८ लाख २६ हजार रुपये आढळले असून, सर्व व्यवहार रोखण्यात आले आहेत.
शहरात गुन्हेगारी टोळ्यांना पाय रोवू देणार नाही. कठोर कायदेशीर कारवाई, आर्थिक नाकाबंदी आणि मालमत्ता जप्ती या तिन्ही आघाड्यांवर धडक मोहीम सुरू राहील.
– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त