महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांच्या ड्रेस भत्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. या नवीन नियमांमुळे नव्याने रुजू होणारे तसेच निवृत्त होणारे कर्मचारी यांना दिलासा मिळणार आहे. टपाल विभागाने 24 सप्टेंबर 2025 रोजी यासंदर्भात आदेश जारी केलाय. त्यानुसार, आता वर्षाच्या मध्यात नोकरीला लागणाऱ्या किंवा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रो-रेटा आधारावर ड्रेस भत्ता मिळणार आहे. यामुळे भत्त्याच्या वितरणाबाबत असलेली अस्पष्टता दूर होणार आहे.
प्रो-रेटा आधारावर भत्ता
नवीन नियमांनुसार, वर्षाच्या मध्यात रुजू होणाऱ्या किंवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीच्या प्रमाणात ड्रेस भत्ता मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभासह स्पष्टता मिळेल.
एकत्रित भत्त्याची संकल्पना
अर्थ मंत्रालयाने 2017 मध्ये स्पष्ट केले होते की, ड्रेस भत्ता हा कपडे भत्ता, गणवेश देखभाल भत्ता, शू भत्ता यासारख्या अनेक भत्त्यांचे एकत्रीकरण आहे. यामुळे प्रशासकीय प्रक्रिया सुलभ झाली आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासा
ऑक्टोबर 2025 नंतर निवृत्त होणारे कर्मचारी अतिरिक्त देयके मिळवण्यास पात्र असतील. मात्र 30 सप्टेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांकडून कोणतीही वसुली होणार नाही.
जुलै महिन्यात भत्ता वितरण
टपाल विभागाने नमूद केले की, ड्रेस भत्ता जुलै महिन्याच्या पगारासह दिला जातो. यंदा अनेक कर्मचाऱ्यांना पूर्ण किंवा अर्धा भत्ता मिळाला आहे.
नवीन कर्मचाऱ्यांसाठी नियम
जुलै 2025 पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जून 2025 पर्यंतच्या नियमांनुसार भत्ता मिळेल. तसेच, मागील वर्षीचा भत्ता जुलै 2025 च्या पगारात समाविष्ट न झाल्यास त्याची दुरुस्ती केली जाईल.या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि स्पष्टता मिळेल, तसेच प्रशासकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.