महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | मुंबईहून पुणे गाठण्यासाठी आता तिसरा महामार्ग लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास आता विना वाहतुककोंडी होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे – बंगळुरू द्रुतगती महामार्ग बांधत असून या महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 830 किमी लांबीचा मुंबई-पुणे-बंगळुरु द्रुतगती प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या पुणे ते बंगळुरू महामार्गाचे काम सुरू असून मुंबई-पुणे महामार्गातील पागोटो चौक दरम्यानच्या 29.129 किमी लांबीच्या महामार्गाचा आराखडा तयार झाला आहे. तर चौक – पुणे, शिवारे दरम्यानच्या अंदाजे 100 किमी लांबीच्या टप्प्याच्या आराखड्याचे काम सुरू आहे. पागोटे – चौक टप्प्याच्या बांधकामासाठी दिवाळीनंतर निविदा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निविदा अंतिम करून नवीन वर्षात महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
पागोटे चौक आणि चौक पुणे, शिवारे महामार्ग पूर्णपणे तयार झाल्यास मुंबई-पुण्यासाठी तिसरा द्रुतगती महामार्ग नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या तिसऱ्या महामार्गामुळं सध्या सेवेत असलेल्या मुंबई-पुणे महामार्गावरील ताण कमी होणार आहे. तसंच, वाहतूक कोंडीदेखील कमी होण्यास मदत होईल. या नवीन महामार्गामुळं मुंबई ते पुणे अंतर केवळ दीड तासांत पार करता येणार आहे.
3653 कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गासाठी रायगडमधील तीन तालुक्यातील 175.94 हेक्टर जागा संपादीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 60 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात 100 टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे एनएचएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.