![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ नोव्हेबर । पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे नाव देण्यात यावे, अशा आशयाचे नाव बदलाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मळवली हे लोणावळ्याच्या अलिकडचे स्टेशन आहे. हे दोन्ही ठराव पुढील मंजुरीसाठी अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतील, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यावेळी सभागृहात केली.
वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मांडला. राजा शिवाजी ग्रामीण विकास मंडळाने याबाबतची मागणी शिवतरे यांच्याकडे केली होती. सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या ठरावास एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर केला. वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे व दिनकर धरपाळे यांनी हा ठराव मंजूर केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.
दरम्यान, मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील सर्वांचे श्रद्धास्थान आहे. या तालुक्यात मळवली येथे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनला एकवीरा देवीचे नाव द्यावे, अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे मांडला. या तालुक्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे केल्याचे मराठे यांनी सांगितले. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.