साई भक्तांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीत प्रसादालय सुरू होणार; पण…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोविड संकटामुळे गेले काही महिने बंद असलेले साई संस्थानचे प्रसादालय सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. साईबाबा संस्थानने त्यासंदर्भात प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने २६ नोव्हेंबरपासून हे प्रसादालय सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठे ‘किचन’ म्हणून साई संस्थानच्या प्रसादालयाची ओळख आहे. याठिकाणी एकाचवेळी साधारण पाच हजार भाविक भोजन प्रसादाचा लाभ घेऊ शकतील अशी व्यवस्था आहे. मात्र कोविड संकटकाळात साई मंदिरासह हे प्रसादालय देखील भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ७ ऑक्टोबरपासून साई मंदिर काही नियम अटींसह भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता शिर्डीतील प्रसादालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

यामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊन भोजनासाठी खाजगी हॉटेल्सशिवाय पर्याय नव्हता. यात भाविकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने आणि साईबाबांच्या प्रसादास मुकावे लागत असल्याने अनेक भाविकांनी साई संस्थानकडे प्रसादालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार साई संस्थानने जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या आटोक्यात असल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने २६ नोव्हेंबर शिर्डीतील ‘साई प्रसादालय’ सुरू करण्यास परवानगी दिली असून भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रसादालय पुन्हा सुरू होणार असले तरी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. प्रसादालयात एकाच वेळी क्षमतेच्या पन्नास टक्के भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर भाविकांनी चेहऱ्याला मास्क लावणे, एकाच ठिकाणी गर्दी न करणे, हात स्वच्छ धुणे ईत्यादी कोविड नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *