महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ नोव्हेबर । संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱया मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावलेल्या तिघा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराची घटना अत्यंत घृणास्पद असली तरी घटनेचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने तिघा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एवढेच नव्हे तर स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहणाऱया आरोपींची फाशी रद्द झाली असली तरी नराधमांचा नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत ते जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत असेही खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले.
मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंड येथे 22 ऑगस्ट 2013 साली विजय जाधव, मोहम्मद कासीम बेंगाली, मोहम्मद सलीम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाने महिला छायाचित्रकारावर बलात्कार केला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपींना 4 डिसेंबर 2014 साली फाशीची शिक्षा सुनावली, तर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या शिक्षेला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केला. 108 पानी निकालपत्रात न्यायालयाने आरोपींच्या कृत्यावर संताप व्यक्त करत बलात्काराची प्रत्येक घटना धक्कादायक आणि क्रूर असते असे निरीक्षण नोंदवले. तसेच ही घटना घडली तेव्हा लोक प्रचंड संतापले होते. पण आम्हाला कायद्याचा विचार करावा लागतो, लोकांच्या मागणीनुसार शिक्षा ठोठावता येत नाही, फाशी हा एक अपवाद असून कायद्यानुसार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा योग्य राहील, असे मत खंडपीठाने निकालात नोंदवले आहे.