विदर्भात थंडीची लाट, पारा 13 अंशांच्या खाली, पुढील आठवडा कसा राहणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ नोव्हेबर । शहरातसोबतच विदर्भात थंडीचा कडाका वाढू लागलाय. गेल्या तीन दिवसांत विदर्भाच्या तापमानात सहा अंशांची घसरण झालीय. यंदाच्या हिवाळ्यात पहिल्यांदाच पारा 13 अंशाच्या खाली गेलाय. देशात पहाडी भागात बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळं अचानक गारठा वाढलाय. दोन दिवसांपूर्वी तापमान 18.3 अंश होते. रविवारी ते 12.4 अंशांवर आलंय. विदर्भात सर्वात कमी नोंद यवतमाळात 12 अंश सेल्सिअस इतकी नोंदवली गेली.

हवामान विभागानुसार, वातावरण कोरडे आहे. तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी उत्तर पूर्व दिशेने थंड वारे वाहत होते. त्यामुळं तापमानात घट दिसून आली. पुढील आठवड्यात मध्य भारतात ढगांची गर्दी दिसून येईल. त्यामुळं रात्रीच्या तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज आहे.

पुढच्या आठवड्यात तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमीत-कमी तापमान 14 ते 16 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मात्र, जास्तीत-जास्त तापमानात मात्र घट होणार आहे. जास्तीत-जास्त तापमान 30 अंशांपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागानं नोंदवला आहे. गेल्या दोन दिवसांत पुन्हा तापमान सामान्यांपेक्षा 2 अंश खाली घसरल्यानं थंडी वाढली आहे.

आकाश ढगाळलेले राहणार
एक ते पाच डिसेंबरपर्यंत आकाश ढगाळलेलं राहण्याची शक्यता हवामान विभागानं नोंदवली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला नागपूरचे तापमान 13.4 अंशांवर पोहचले होते. 10 नोव्हेंबरला 13.2 अंशांची नोंद झाली. त्यानंतर तापमान वाढायला लागले.

विदर्भातील तापमान
रविवारी विदर्भात तापमानात घट झाल्याचं दिसून आलं. गोंदिया 12.8 अंश, वर्धा 13.9 अंश, अमरावती व चंद्रपूरमध्ये 14 अंश, बुलडाणा 15.2 अंश, अकोला 15.4 अंश, वाशिम 16 अंश, तर गडचिरोलीमध्ये 16.4 अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली. पुढच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार असल्यानं तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *