येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून मराठी शाळांत द्विभाषिक अभ्यासक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ नोव्हेबर । राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व मराठी शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

यासंदर्भात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, सध्या 488 आदर्श शाळांत प्रायोगिक तत्त्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक व द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे यश पाहता मराठी शाळांत याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढील वर्षीच्या अभ्यासक्रमात आणि इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मराठीसह इंग्रजी भाषेतील संज्ञा, दैनंदिन शब्द, संकल्पना स्पष्टपणाने समजाव्यात, मराठी शब्दांच्या जोडीला सोप्या इंग्रजीमधील शब्द, वाक्यांचा उपयोग समजावा अशा प्रकारे पाठय़पुस्तकांची रचना करावी, असे निर्देश राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाना दिले आहेत. पाठय़पुस्तकांची रचना आकर्षक, जागतिक दर्जाची असावी असेही निर्देश अधिकाऱयांना दिले आहेत. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाइन उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *