महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २ दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सायंकाळी त्यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी श्रीगणेशाला साकडे घातले. तसेच ‘जय मराठा, जय बांगला’ असा नाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप रुग्णालयात असल्याने ममता बॅनर्जी त्यांची भेटू घेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे रात्री पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी हॉटेल ट्रायडंट येथे राज्याचे पर्यटनमंत्री व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.
सिल्व्हर ओकवर होणार भेट
ममता बुधवारी दुपारी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठकीला हजर राहतील. दुपारी ३.१५ वाजता त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. रात्री शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या स्वागत समारंभास हजर राहणार आहेत.
पालिका निवडणुकीत लाभ
फेब्रुवारीत मुंबई मनपा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममतांची मुंबई भेट अन् ‘जय मराठा, जय बांगला’ घोषणा देणे शिवसेनेच्या पथ्यावर पडेल. मुंबईतला बंगाली मतदार सेनेच्या बाजूने उभा राहील, अशी अटकळ आहे. लोकसभेच्या दृष्टीने ममता व शिवसेनेत जवळीक वाढते आहे.