महाराष्ट्रात खबरदारी घेतली जात आहे ; सध्या तरी स्थिती नियंत्रणात- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । जगातील 19 देशांमध्ये ओमिक्रॉन(Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा (Corona Varient) शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात आणि महाराष्ट्रात खबरदारी घेतली जात आहे. सध्या तरी भारतातली स्थिती अत्यंत धोकादायक अशी नाही. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी आज त्यांनी सविस्तर संवाद साधला.

महाराष्ट्रात खबरदारीचे कोणते उपाय?
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे जग चिंतेत असताना महाराष्ट्रात काय खबरदारी घेतली जात आहे, याविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. –
– कस्तुरबा रुग्णालयात टेस्ट लॅब आहेत. तेथे जेनेटिक सिक्वेन्सिंगचे नमूने तपासायला दिले आहेत. कस्तुरबासारखे लॅब अजून बनवण्याचे काम सुरु आहे.
– परदेशातून आलेल्या व्यक्तींना 7 दिवस क्वारंटाइन करावे लागेल.
– 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– सध्या तरी एवढी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही, असे WHO ने सांगितले असले तरीही ओमिक्रॉनचा अहवाल आल्यानंतरच यासंबंधी निर्णय घ्यावा लागेल.

मुलांच्या लसीकरणाबद्दल काय म्हणाले आरोग्यमंत्री?
राज्यातील लहान मुलांसाठी लसीकरण कधी होणार आणि कोरोना लसीच्या बुस्टर डोसविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, या दोन्ही विषयांसाठी मी स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली. मात्र यावर आयसीएमआरनं दिलेल्या सूचनांनंतरच निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

शाळा सुरु करणे किती योग्य?
सध्याच्या परिस्थितीत राज्यातील शाळा सुरु होणे किती योग्य आहे, याविषयी विचारले असता राजेश टोपे म्हणाले, हा प्रश्न स्थानिक पातळीवरील प्रशासनावर अवलंबून आहे. सध्या तरी ओमिक्रॉनचा कोणताही धोका नाही. विविध तज्ज्ञांनीही मुलांनी आता शाळेत येणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळेच आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांनी मुलांची काळजी करणे स्वाभाविक आहे. पण त्यांना खबरदारीचे उपाय, नियम पाळायला लावणे हे त्यांनीच पुढाकार घेऊन शिकवले पाहिजे, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *