![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । दिल्लीच्या केजरीवाल सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीत सरकारने व्हॅट कमी करून पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त केले आहे. पेट्रोलवरील व्हॅट(मूल्यवर्धित कर) 30% वरुन 19.40% करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत सध्याच्या 103.97 रुपयांवरुन 95.97 रुपयांपर्यंत खाली आली आहे. पेट्रोलचे हे नवे दर आज रात्री 12 वाजल्यापासून लागू होतील.
पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे. यापूर्वी राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. त्यानंतर आता दिल्लीतही हे पाऊल उचलण्यात आले आहे. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोल 103.97 दराने उपलब्ध आहे, तर नोएडामध्ये पेट्रोलचा प्रति लिटर दर 95.51 आणि गुरुग्राममध्ये 95.90 रुपये आहे. त्यामुळे दिल्लीतील फिलिंग स्टेशनवर ग्राहकांची कमतरता होती. बहुतांश ग्राहक यूपी आणि हरियाणातून तेल आणत होते.
महाराष्ट्रातील जनतेला दिलासा कधी मिळणार ?
वर्षाच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत होते. पण, दिवाळीनिमित्त मोदी सरकारने उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली. त्यामुळे तेलाच्या किमती घसरल्या. यानंतर, एनडीए शासित राज्यांनी आपापल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. काही दिवसांनी पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारांनीही जनतेला दिलासा दिला. पण, अद्याप महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले नाहीत.