ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य; घाबरण्याचे कारण नाही : संशयित 28 नमुने तपासणीला ; आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ डिसेंबर । महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित झालेला अद्याप एकही रुग्ण नाही. राज्य सरकार सतर्क असून १० नोव्हेंबरपासून राज्यातील मुंबई विमानतळावर येणाऱ्या ८६१ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी तीन पॉझिटिव्ह आले. या तिघांसह त्यांच्या संपर्कात असलेल्या २८ संशयितांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.

ओमायक्रॉनचे ३० देशांत रुग्ण आढळले आहेत. त्याची संसर्गक्षमता पूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत खूपच अधिक आहे. असे असले तरी याची लक्षणे सामान्य आहेत. अगदी ऑक्सिजन लावण्याचीही गरज भासत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असेही टोपेंनी स्पष्ट केले. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तणूक पाळण्यावर भर द्यावा, कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घ्यावेत. राज्यात पहिला डोस घेणारे नागरिकांचे प्रमाण ८० टक्केहून अधिक आहे. दुसरा डोस घेणारे नागरिकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घ्यावेत, ज्यामुळे आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. सोबत सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होईल, असेही टोपे यांनी नमूद केले.

– आमच्या प्रयोगशाळेतील जनुकीय क्रम निर्धारण यंत्रणेत २८७ सॅम्पल प्रक्रियेत असून ७२ तासामध्ये अहवाल येईल, अशी माहिती कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली. – मुंबई शुक्रवारी कोरोनाचे १८६ नवे रुग्ण आढळले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३६२७२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *