‘बिग मी इंडिया’त ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष दाखवून 40-50 कोटी रुपयांचा गंडा, 7 जणांवर गुन्हा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । ऑनलाइन गुंतवणुकीवर रोज ३०० ते १,५०० रुपये कमिशन देण्याचे आमिष दाखवून एकाने राज्यभरातील अनेकांना सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून फसवणूक झालेल्यांपैकी काही जणांनी शनिवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ एकनाथ राऊत (३८, रा. पाथरवाला, ता. नेवासा, सध्याचा पत्ता – माउली रेसिडेन्सी, पाइपलाइन रोड, सावेडी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी राऊत याच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोमनाथ राऊत याने डिसेंबर २०१९ मध्ये ‘बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी स्थापन करून ‘फंड पे’ नावाचे वॉलेट सुरू केले. या कंपनीअंतर्गत तो नागरिकांना मोबाइल, डिश टीव्हीचे रिचार्ज, पतसंस्था, कंपन्या यांना ऑनलाइन बिल पेमेंट करण्याची सुविधा देत होता. तसेच आरटीजीएस, एनएफटी व्यवहार करण्याची सेवाही दिली जात होती. याद्वारे लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने लोकांना ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यास सुरुवात केली.

फंड पे अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक : १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर प्रतिदिन ३०० ते १,५०० रुपये कमिशन मिळेल, असे आमिष राऊत याने दाखवले. यासाठी “फंड पे’ मोबाइल अॅपही सुरु केले. त्याद्वारे जवळपास ५० लाख रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. तसेच कमीत कमी ५०० ते १ हजार रुपयांची गुंतवणूक सुविधाही त्याने उपलब्ध केली. त्याच्याकडे एकूण साडेचार लाख लोकांनी गुंतवणूक केली असल्याची माहिती फिर्यादी सतीश बाबुराव खोडवे (रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे. त्यामुळे ही गुंतवणूक सुमारे ४० ते ५० कोटींपर्यंत असू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.

२९ ऑगस्ट २०२१ पासून राऊत बेपत्ता असल्याचे सतीश खोडवे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राऊत बेपत्ता झाल्याचे कळताच इतर ठेवीदारांनी एकत्रित येत तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी दुपारी खोडवे, असलम शफीक शेख (रा. विळद), शेखर (पुणे), यांच्यासह मुंबईहून एक महिला तक्रार देण्यास आली होती. पोलिसांनी सोमनाथ राऊत, त्याची पत्नी व कंपनीची डायरेक्टर सोनिया सोमनाथ राऊत हिच्यासह वंदना पालवे (केडगाव), सुप्रिया आरेकर (बुऱ्हाणनगर), प्रितम शिंदे (पुणे), प्रीती शिंदे (दिल्लीगेट), शॉलमन गायकवाड (रा. पाईपलाई रोड, नगर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमासह विश्वासघात व फसवूक, संगनमत करणे, आदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कॉर्पोरेट ऑफिस व जाहिरातींना भुलले : फसवणूक झालेल्यांपैकी अनेकांनी आपण बिग मी इंडिया कंपनीची वाहिन्यांवर जाहिराती पाहिल्या. त्यात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे सांगितले होते. तसेच अॅपवरही माहिती दिलेली होती. जाहिरातीत होर्डिंगवर पुण्यातील कॉर्पाेरेट ऑफिस दाखवले होते. त्यामुळे आपला या कंपनीवर विश्वास बसला, असे सांगितले. या कंपनीत फसवूक झालेल्यांनी पोलिसांकडे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीडसह राज्यभरातून तक्रारी
राऊत याने ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. शनिवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या सतीश खोडवे यांनी ही संख्या सुमारे साडेचार लाख असल्याचे सांगितले आहे. अहमदनगरसह, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, नागपूर, उस्मानाबाद, मुंबई येथील जवळपास ५० जणांचे अर्ज पोलिसांनी स्वीकारले आहेत.

– राऊत याने नगरमधील दोन खासगी बँकांमध्ये कंपनीच्या नावाने खाती सुरू केली. या खात्यामध्ये त्याने पैसे भरण्यास सांगितले होते. त्यामुळे पोलिस या बँकांकडेही चौकशी करणार आहेत. – गुंतवणूक केलेल्यांपैकी कुणाला पैसे परत मिळाले की नाही हे समजू शकले नाही. मात्र ज्यांची फसवणूक झाली त्यांनी वारंवार राऊत याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याने प्रतिसाद दिला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *