मनसे महाराष्ट्राचे 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करणार, अमित ठाकरेंची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. येत्या शनिवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन अमित ठाकरे यांनी केले आहे.

अमित ठाकरे यांनी एक व्हिडीओ जारी करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभाग घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. अमित ठाकरे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, “नमस्कार, मी आज तुमच्यासमोर माझ्या मनाच्या जवळचा एक मुद्दा घेऊन येत आहे. ते म्हणजे, आपले समुद्र किनारे स्वच्छ आणि सुरक्षित करणे.

आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे 720 किलोमीटर लांबी असलेल्या समुद्र किनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आहे, असे मला वाटते. आपल्या सर्वांनाच कुठे ना कुठेतरी वाटत असेल, परदेशात असलेली समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर का असतात? आणि आपल्या राज्यात ते का असू शकत नाही?

आपले समुद्र किनारे अस्वच्छ आणि भकास का दिसतात? त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. फक्त सरकारवर अवलंबून न राहता, आपल्याला जबाबदारी घेणे गरजेचे आहे. जगभरातील विविध देशांत समुद्र आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

सर्वसामान्य लोकही याबाबत जागरुक आहेत आणि त्यांना याबाबतची जाण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना अख्या महाराष्ट्रात राबवणार आहे. ही मोहीम महाराष्ट्रातील 40 समुद्र किनाऱ्यांवर येत्या 11 डिसेंबरपासून रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे.

जर आपल्या जवळचे समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असावेत अशी तुमचीही इच्छा असेल, तर आमच्या या मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आपल्या सर्वांच्या मेहनतीने हे समुद्र किनारे स्वच्छ होतील, याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र!” असे म्हणत समुद्र स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *