![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ डिसेंबर । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी या ठिकाणी त्यांना अभिवादन करता येणार आहे. शिवाय ऑनलाइन थेट दर्शनही घेता येणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे भीम अनुयायांना चैत्यभूमीवर येता आले नव्हते . मात्र या वर्षी कोरोना खबरदारी घेऊन अभिवादनास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी पालिकेच्या माध्यमातून सर्व प्रकारची सुविधा तैनात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी चैत्यभूमीवर येत असल्याने शिवाजी पार्कवर तेथे महापालिका आणि विविध सामाजिक संस्थांमार्फत अल्पोपहार, पाणी, जेवणाची सोय करण्यात येते. शिवाय शिवाजी पार्कवर आंबेडकरी आणि बुद्धिस्ट विचारांवर आधारीत पुस्तके आणि विविध साहित्याच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात येतात. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदाही असे स्टॉल्स लावण्यात येणार नाहीत. मात्र रांगेत असलेल्या अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधा करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दूरदर्शन सहय़ाद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी 7.45 ते सकाळी 10 या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.50, 10.50, 11.50 तसेच दुपारी 12.50 वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
थेट ऑनलाइन दर्शनाचीही सोय
शासकीय मानकंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सहय़ाद्री वाहिनीवरून सकाळी 7.45 ते सकाळी 10 कालावधीमध्ये केले जाणार आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूटय़ूबः https://bit.ly/6december21YT/ फेसबूकः https://bit.ly/6december21FB / ट्विटरः https://bit.ly/6december21TT