पुणे: दुबईतून आलेल्या १२९ प्रवाशांची तपासणी; करोना संशयित नाही

Spread the love

महाराष्ट्र २४- पुणे: दुबई-पुणे स्पाइसजेट विमानातून आज पहाटे १२९ प्रवासी आले असून या सर्व प्रवाशांची विमानतळावरच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकाही प्रवाशामध्ये करोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पाइसजेट एअरलाइन्सचे दुबई-पुणे हे विमान (क्र. एसजी-५२) पुणे विमानतळावर पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी उतरले. या विमानात ७४ पुरुष, ४१ महिला, १४ लहान मुले असे एकूण १२९ प्रवासी होते. त्यात ११८ भारतीय नागरिक तर ११ परदेशी नागरिक होते. या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यात करोना संशयित एकही रुग्ण आढळलेला नाही, असे पुढे नमूद करण्यात आले.

विमानातील एका २६ वर्षीय महिलेने तिला व तिच्या एक वर्षाच्या बाळाला कफ असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांनाही नायडू रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अन्य प्रवाशांना घरी सोडण्यात आले असून घरात पुढील काही दिवस इतरांपासून वेगळं राहण्याची सूचना देण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासन, पुणे विमानतळ व्यवस्थापन, वैद्यकीय पथक आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने ही तपासणी व अन्य कार्यवाही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *