‘आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं.’ शरद पवारांनी सांगितला किस्सा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ डिसेंबर । कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरांतून सीडीएस जनरल रावत यांच्यासह मृत्यू पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवाय या घटनेनंतर याआधीच्या काही घटनांवर देखील बोललं जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो.

‘त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. वाऱ्याचा वेगही जास्त होता. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं.

‘आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळे मी सांगितले, महाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वांत उंच शिखर आहे. ते 5 हजार फुटांच्यावर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण 7 हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो,’ असं पवार यांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *