महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ डिसेंबर । संपूर्ण जगावर सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचे सावट आहे. पण महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून ओमायक्रॉन संसर्गाची लागण झालेल्या एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. आतापर्यंत राज्यात या विषाणूचा संसर्ग झालेल्या दहाच रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कल्याण डोबिंवली येथे आढळलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण (Omicron variant in Maharashtra) बरा झाला आहे. त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण हा ३३ वर्षीय मेकॅनिकल इंजिनियर होता. उपचारानंतर तो कोरोनातून बरा झाला असून त्याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण त्याला ७ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.
ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण (Omicron variant in Maharashtra) असलेला व्यक्ती २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून कल्याण-डोंबिवलीत दाखल झाला होता. तो दुबईमार्गे मुंबईत आला होता. तो ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रूग्ण आहे.
कल्याण डोंबिवलीत आलेल्या या रूग्णाला सौम्य ताप आला होता. त्याच्यावर कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. तो अवघ्या काही दिवसांत बरा झाला आहे.
नवा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कमी घातक
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनची सर्वत्र चर्चा आहे. या नव्या व्हेरियंटबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर सध्या असणार्या कोरोना प्रतिबंधक लस (COVID Vaccine) कितपत प्रभावी ठरणार यावरही चर्चा सुरु आहे. आता यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (‘डब्ल्युएचओ) दिलासादायक माहिती दिली आहे.
‘डब्ल्युएचओ’च्या वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचा नवा व्हेरियंट हा मागील व्हेरियंटच्या तुलनेत कमी घातक आहे. ज्यांनी कोरोनाच्या दोन लस ( COVID Vaccine) घेतल्या आहेत. त्यांच्यावर याचा प्रभाव कमी असेल. कोरोना प्रतिबंधक लस या ओमायक्रॉनवर प्रभावी ठरु शकतात. सध्या तरी या नव्या व्हेरियंटबाबत खूप काही माहिती नाही; पण सुरुवातीच्या संशोधनामध्ये ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी धोकादायक असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.