व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बदलण्याची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ डिसेंबर । राज्यात व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या धर्तीवर राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एसटी संप, ओमायक्रॉनचा धोका आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद कमी असल्याने प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणीही केली जात आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव आणि राज्यात झालेल्या पावसामुळे यंदा सामायिक प्रवेश परीक्षेसह (सीईटी) प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. तसेच एसटी संप, ओमायक्रॉन या करोनाच्या उपप्रकाराच्या संक्रमणाचा धोका, प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा उशीर अशा कारणांनी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरियाचे अध्यक्ष रामदास झोळ म्हणाले की, प्रवेश प्रक्रियेत अद्याप विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत केवळ १५ टक्केच विद्यार्थी प्रवेशासाठी आले आहेत. बेटरमेंट घेणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे गुणवत्ता यादीतील अन्य विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळत नाही. बेटरमेंट न स्वीकारणाऱ्या आणि प्रवेशही न घेणाऱ्या विद्याथ्र्याला तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुन्हा संधी जात असल्याने अन्य विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अशा विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये बाद केले जाते. प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्र आहे. वास्तुकला अभ्यासक्रमाला एकच फेरी, तर अभियांत्रिकीसारख्या अभ्यासक्रमांच्या दोन फेऱ्या घेतल्या जातात. या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याने गोंधळ होत आहे.

प्रवेश प्रक्रिया वेळेत संपण्याच्या दृष्टीने सीईटी सेलने नियोजन केले आहे. अधिक फेऱ्यांबाबत शासनस्तरावरून निर्णय झाल्यास पुढील वर्षी त्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवता येईल.
– रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *