महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । सातारा (satara hill marathon) : येत्या रविवारी सातारा शहरात सातारा हिल हाफ मॅरेथाॅन २०२१ (satara hill half marathon) स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सातारा जिल्हा पाेलिस दलाने रविवार (ता.१२) पहाटे पाच ते ११ वाजेपर्यंत वाहतुक सुरळीत राहण्यासाठी वाहतुक व पार्किगमध्ये अंतर्गत बदल केले आहेत.
ही स्पर्धा पाेलिस कवायत मैदान येथून सुरु हाेईल. धावपटू मरिआई काॅम्पलेक्स , शाहू चाैक , अदालत वाडा, समर्थ मंदिर मार्गे यवतेश्वर घाट, प्रकृती हिल रिसाॅर्ट पासून पुन्हा वळून त्याच मार्गाने समर्थ मंदिर, अदालत वाडा मार्गे शाहू चाैक, पाेवई नाका मार्गे पाेलिस कवायत मैदान येथे येतील. या मार्गावर रुग्णवाहिका, पाेलिस वाहने, अग्नीशामक दलाची वाहने वगळून सर्व वाहनांना स्पर्धा कालावधीत प्रवेश बंद राहणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा पाेलिस दलाने दिली आहे.
सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२१ अनुषंगाने सातारा शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत . #SataraPolice pic.twitter.com/7CAyLTInp8
— satara police (@SataraPolice) December 10, 2021
कास बाजूकडून सातारा शहर बाजूकडे येणारी वाहने मॅरेथाॅन स्पर्धा संपपर्यंत प्रकृती रिसाॅर्ट बाजूकडून सातारा बाजूच्या दिशेने येणार नाहीत. ती पर्यायी मार्गाने एकीव फाटा , एकीव, गाेळेश्वर, कुसुंबीमुरा, कुसुंबी, मेढा मार्गे सातारा शहराकडे येतील. तरी नागरिकांनी १२ डिसेंबरला हाेणा-या मॅरेथाॅन स्पर्धेसाठी केलेल्या वाहतुकीच्या बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक पाेलिस निरीक्षक विठ्ठल शेलार (वाहतुक शाखा) यांनी केले आहे.