महाराष्ट्र २४- नवी दिल्ली : केरळमध्ये देशातील पहिले तीन रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. तेव्हा सर्वात आधी या रुग्णांना वेगळं ठेवण्यात आलं आणि हे खूपच कठीण होतं. कारण रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यासाठी तयार होत नाही. त्यासाठी या रुग्णांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं काऊन्सिलिंग करण्यात आलं.याशिवाय वेगवेगळ्या देशांमधून येणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करूनच पुढे सोडलं जात आहे. यातच चीनमधून आलेल्या व्यक्तींची सर्वात आधी रक्तचाचणी करण्यात आली. रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना रुग्णालयात 72 तासांसाठी देखरेखीत ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना घरीदेखील 24 तास आइसोलेशनमध्ये ठेवलं. यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मदत होत आहे.
चीनमधून जगात पसरलेल्या कोरोनामुळे अनेक देशांमध्ये नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी असलं तरी त्याची धास्ती लोकांनी घेतली आहे. अनेक विकसित देशांमध्ये कोरोना झपाट्यानं पसरत असून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढलं आहे. मात्र भारतात यावर यशस्वी मात होत असताना दिसत आहे. आतापर्यंत भारताने 10 कोरोनाग्रस्त रुग्णांवर य़शस्वी उपचार केले.
याआधी केरळमध्ये पहिले तीन रुग्ण आढळले होते. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर आता आणखी 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्या रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. सध्या 71 रुग्ण देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यात रुग्ण आढळले आहेत त्यांनी खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणं, कार्यक्रमास बंदी घातली आहे. त्याशिवाय शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे हेसुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. तसंच आयपीएलसुद्धा 15 एप्रिलपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे.
द प्रिंटला दिलेल्या एका मुलाखतीत केरळच्या anti-nCoV task force चे इन्चार्ज डॉं अमर फेटले यांनी सांगितलं की, तिन्ही रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणं होती, त्यामुळे आम्ही त्यांना पॅरासिटामोल आणि अशी औषधं दिली ज्यामुळे त्यांच्यामधली ही लक्षणं कमी होतील. यामध्ये सर्दी-खोकल्याची औषधंही होती. तिन्ही रुग्ण बरे झाल्यानंतर आणि त्यानंतर केरळमध्ये कोरोनाव्हायरसचं कोणतंही नवीन प्रकरण सापडलं नाही. मात्र देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले.