महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । नगर : अगदी गेल्या महिन्यांपासून १० रुपये किलोने विकल्या जाणार्या टोमॅटोचे दर वाढले आहेत. आजमितीला त्याची किंमत ८० रुपये प्रतिकिलो ( Tomato Price ) झाली आहे. उत्पादन घटले आणि मागणी कायम राहिल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे भाजीपाला व्यावसायिकांनी सांगितले. तथापि, या दरवाढीचा ( Tomato Price ) शेतकर्यांपेक्षा व्यापार्यांनाच फायदा अधिक होत असल्याचे चित्र आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. दिवाळीनंतर थोडा वापसा होतो ना होतो तोच, बंगाल आणि अरबी समुद्रातील वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा पाऊस झाला. गेला आठवडाभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे पिकांची वाढ खुंटण्यासह कीडीचा प्रादुर्भावही झाला. मात्र, मागणी कायम राहिल्याने टोमॅटोचे भाव वाढत जाऊन आज ते ८० रुपये प्रतिकिलोवर स्थिरावले आहेत. साहजिकच, त्यामुळे सामान्य लोकांच्या किचनच्या बजेटवर परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भाज्यांचे वाढलेले दर असेच राहतील आणि नंतर कमी होतील, असे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे.
शेजारील पुणे, औरंगाबाद, नाशिक या महानगरांमध्ये नगरच्या टोमॅटोंना मोठी मागणी असून, किंमतही चांगली मिळत असल्यामुळे नगरचे शेतकरी या महानगरांमध्ये टोमॅटो विक्रीस पाठवित आहेत. त्याचाही परिणाम नगरमधील टोमॅटोच्या दरवाढीवर झाला आहे. किरकोळ विक्रीत तीन ते चार पटीने भाव वाढ झाली आहे. टोमॅटोसह अन्य भाजीपाला आणि फळभाज्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. 40 रुपये किलोची गवार आता 60 रुपये किलो, कांदा 30 ते 60 रुपये, चंपाषष्ठीमुळे वांग्याची मागणी वाढून किंमत 35 वरून 70 रुपये किलो झाली होती. शिमला मिरचीदेखील 30 रुपयांवरुन 50 रुपये किलो झाली आहे.