राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम, पुण्यात पारा 12 अंशावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात (Weather in india) झपाट्याने बदल जाणवत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रासह दक्षिण-पूर्व भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी (heavy rainfall) लावली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. रब्बी हंगामातील अनेक पिकांवर कीड पडल्याने संपूर्ण पीक वाया गेलं आहे.

असं असताना अद्याप राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. महाराष्ट्रात थंडीची लाट येण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील पाचही दिवस देशात कोरड्या हवामानाची शक्यता असून किमान तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तूर्तास पश्चिम आणि मध्य भारतात बहुतांशी ठिकाणी थंडीची लाट नाही. पुढील पाचही दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे.

खरंतर, सध्या तमिळनाडू-दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवर आणि त्याजवळील बंगालच्या उपसागर परिसरात ईशान्य वार्‍यांचा प्रभाव आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि यानम, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पाँडेचेरी, कराईकल आणि केरळमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.

पुण्यात पारा 12 अंशावर

गेल्या आठवडाभरापासून पुण्यातील किमान तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. आज सकाळी पुण्यातील शिरूर याठिकाणी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी 12.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ हवेली आणि पाषाण याठिकाणी अनुक्रमे 13.7 आणि 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय एनडीए (14.2), शिवाजीनगर (14.7), तळेगाव (14.7), दौंड (15.4), निमगीरी (14.9) आणि लवळे याठिकाणी 17.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *