इम्तियाज जलील यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना टोलमाफी ? पुणे-मुंबई महामार्गावर टोल न घेता गाड्या सोडल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । एमआयएम (AIMIM) पक्षाकडून मुंबईत तिरंगा रॅलीचं (Tiranga Rally) आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे आज सकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबाद (Aurangabad) येथून मुंबईच्या (Mumbai) दिशेला रवाना झाले आहेत. दुसरीकडे मुंबईत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सभा, रॅलीला परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तरीही इम्तियाज जलील हे मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे जलील यांचा ताफा जेव्हा पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोलनाक्यावर दाखल झाला तेव्हा एक विचित्र चित्र बघायला मिळालं. टोल नाक्यावर जलील यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांकडून टोल आकारला गेला नाही. त्यामुळे खासदारांसोबत असलेल्यांसाठी वेगळा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

इम्तियाज जलील यांच्याबरोबर असलेला कार्यकर्त्यांचा मोठा ताफा हा पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन विभागून मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. मात्र पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून टोल आकारणी देखील केली जात नसल्याने सर्वसामान्यांना वेगळा न्याय असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे उर्से टोल नाक्यावरुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन जलील मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारो गरीब मुस्लिमांच्या वक्फच्या जमिनी लाटल्या गेल्या आहेत. त्या गरीब मुस्लिम लोकांच्या 93 हजार हेक्टर जमिनी या केवळ कागदोपत्री आहेत. त्या जमिनी कुठे गेल्या? तर काही जमिनींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर काही जमिनींवर काँग्रेसच्या नेत्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी कब्जा केला आहे. तसेच मुस्लिम आरक्षण दिल गेलं पाहिजे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हजारोंच्या संख्येने मुंबईत जात असल्याची प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

एमआयएमची मुंबईत सभा
मुंबईतील चांदिवली येथील शाळेच्या ग्राऊंडवर सभा होणार आहे. या रॅलीच्या संदर्भात आम्ही रितसर परवानगी पोलिसांकडून घेतली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही रॅली घेणार असं जाहीर केलं तेव्हा तेव्हा राजकारण होत रॅलीला परवानगी नाकारली गेलीय. त्यामुळे यावेळी आम्ही या रॅलीबाबत आधीच जाहीर केलेलं नव्हतं असंही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *