महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .14 डिसेंबर । या आठवड्यात भारताच्या संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उड्डाण करायचे आहे. भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय मालिका होणार आहे. या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराट कोहलीकडून मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. त्याने यापूर्वीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून राजीनामा दिला होता. आता अजून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळणार नसल्याचे बोलले जात आहे.
क्रिकट्रॅकरच्या वृत्तानुसार, विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून विश्रांती घेणार आहे. याच दरम्यान म्हणजेच ११ जानेवारीला विराटची मुलगी वामिका एका वर्षाची होणार आहे. त्यामुळे विराट आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छित असल्याचे वृत्त आहे. विराटच्या विश्रांतीची बातमी अजून एका कारणासाठी धक्कादायक आहे, कारण त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत विराट हे पाऊल का उचलत आहे, हा मोठा प्रश्न आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची अडचण वाढली आहे.