महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याने देशातील ( omicron cases in india ) रुग्णांची संख्या ही ८७ वर पोहोचली आहे. देशात गुरुवारी १४ नवीन रुग्ण आढळून आले. दक्षिण आफ्रिकेत हा वेरियंट आढळून आल्यानंतर एक महिन्याहून कमी कालावधीत ८० देशांमध्ये तो पसरला आहे. भारतातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. ही रुग्ण कुठे आहेत, ओमिक्रॉनची लक्षणे काय आहेत आणि कोणत्या गोष्टी या प्रकाराला धोकादायक बनवतात हे जाणून घेऊया….
देशात ओमिक्रॉनचा संसर्ग गुरुवारी १४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये कर्नाटकातील ५, दिल्ली आणि तेलंगणातील प्रत्येकी ४ आणि गुजरातमधील एका नवीन रुग्णाचा समावेश आहे. अशा प्रकारे, देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या ८७ वर गेली आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात ३२, राजस्थान १७, दिल्ली १०, गुजरात ६, केरळ ४, कर्नाटक ८, तेलंगण ६, आंध्र प्रदेश, चंदीगड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत प्रत्येक एक रुग्ण आढळून आला. यापैकी अनेक रुग्ण बरेही झाले आहेत.
ओमिक्रॉनच्या संसर्गाची लक्षणे करोनाच्या आधीच्या वेरियंटपेक्षा थोडी वेगळी आहेत. काहीसा घसा खवखवणे आणि अंगावर काटे येणे, थकवा, अंगदुखी आणि हलका ताप ही ओमिक्रॉन संसर्गाची मुख्य लक्षणे आहेत. कुठल्याही गोष्टीचा वास जाणवत नाही, असे रुग्ण अद्याप भारतात आढळून आलेले नाहीत. घसा खवखवणे, थकवा येणे आणि अंग दुखणे ही लक्षणे बहुतांश रुग्णांमध्ये दिसतात. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणंच दिसली नाहीत.
Omicron खूप वेगाने पसरतो. हाँगकाँग विद्यापीठाने केलेल्या नवीन अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय धक्कादायक आणि चिंता वाढवणारे आहेत. Omicron वेरियंट हा करोनाच्या डेल्टापेक्षा ७० पट वेगाने पसरतो. भारतातील करोनाच्या दुसऱ्या लाटेला डेल्टा वेरियंट कारणीभूत होता.
करोना संसर्गातून बरे झाले आहेत, त्यांना देखील ओमिक्रॉन संसर्ग होतोय. सध्याच्या लसी याला प्रतिबंध करण्यासाठी कमी प्रभावी ठरत आहेत. AstraZeneca लसीचा दुसरा डोस (Covishield in India) दिल्यानंतर ६ महिन्यांनी Omicron चा संसर्गापासून संरक्षण होत नाही, असे ब्रिटनमध्ये एका संशोधनात दिसून आले आहे.