महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । उत्तर भारताच्या पर्वतीय राज्यांत थंडीची लाट सुरू आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पर्यटनस्थळांना थंडीच्या गंभीर लाटेचा फटका बसला आहे. येत्या पाच दिवसांपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे १० अंश सेल्सियस नोंदले आहे. हे सरासरीपेक्षा ६ अंश कमी आहे. याच पद्धतीने पहलगावमध्येही सरासरीपेक्षा ५ अंश कमी उणे ६.९ अंश सेल्सियस तापमान नोंदले आहे. यासोबत लडाखच्या लेहमध्ये उणे १५ अंश, कारगिलमध्ये उणे १२ अंश सेल्सियस नोंदले आहे. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये चिल्लई कला सुरू होण्याआधी ही स्थिती आहे. काश्मीरमध्ये २१ डिसेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत ४० दिवस पडणाऱ्या थंडीस चिल्लई कला संबोधले जाते. हिमाचलच्या काल्पामध्ये उणे ६ अंश, केलांगमध्ये उणे ७.९ तापमान आहे. हे सरासरीपेक्षा ४-५ अंश कमी आहे.
मध्य भारत, गुजरातमध्ये तापमान घटेल
आगामी पश्चिम विक्षोभ २२ डिसेंबरला येत आहे. तेव्हा संपूर्ण हिमालय क्षेत्रातील राज्यांत पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता आहे. पर्वतीय पर्यटनस्थळांवर पर्यटकांना या वेळी बर्फवृष्टीत नाताळ साजरा करण्याची संधी मिळू शकते. २३ ते २६ डिसेंबरदरम्यान पंजाब, हरियाणा, राजस्थान व उत्तर प्रदेशात या हिवाळ्यात पहिल्या पावसाची शक्यता आहे.
– येत्या ४-५ दिवसांदरम्यान उत्तर पश्चिम व मध्य भारत आणि गुजरातच्या बहुतांश भागांतील किमान तापमानात २-४ अंश सेल्सियसची घसरण येईल. पूर्व भारत व महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतही तापमान येत्या ४ दिवसांत २-३ अंश सेल्सियस खाली उतरेल.
– १७ ते २१ डिसेंबरदरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड व गुजरातच्या सौराष्ट्र-कच्छमध्ये थंडीची लाट येत आहे. १८ ते २१ डिसेंबरदरम्यान उत्तर राजस्थानात, १९ ते २१ डिसेंबरला पश्चिम उत्तर प्रदेश व दिल्ली आणि १९ व २० डिसेंबरला गुजरातमध्ये थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे.