मी काय पक्ष गहाण ठेवायला काढलाय का ? कुणी असो-नसो, पक्ष कायम राहणार आहे: राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सध्या राज्यव्यापी दौरा सुरू आहे. गुरुवारी राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या. या वेळी भविष्यात पक्ष भाजपसोबत जाणार काय, असा प्रश्न एका पदाधिकाऱ्याने विचारला. त्या वेळी “मी काय पक्ष गहाण ठेवायला काढलाय का, आपण आपल्या ताकदीवर लढायचे, पक्षाच्या सूचनांचे पालन करा, कुणीही उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल,’ अशा शब्दांत संबंधित पदाधिकाऱ्याला सुनावले.

कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करावे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन कामे करा. आता गाफिल राहू नका, ही आरपारची लढाई आहे, पक्षाची ताकद दाखवून देण्याची आता गरज आहे, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. गुरुवारी कसबा, पर्वती, कॅन्टोन्मेंट व वडगाव शेरी येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठका संपन्न झाल्या. या बैठकीसाठी केवळ संबंधित विभागांच्या पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. त्याव्यतिरिक्त अन्य कुणालाही बैठकीच्या ठिकाणी येऊ न देता गुप्तता पाळण्यात आली. केसरीवाडा येथे सकाळी अकरा वाजता ठाकरे यांची बैठक सुरू झाली. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना निवडणुकांना कसे सामोरे जायचे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यास कसे प्राधान्य द्यावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या सूचनाही ऐकून त्याची नोंदही घेतली. बैठक झाल्यानंतर ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांच्या संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली.

कुणी असो-नसो, पक्ष कायम राहणार आहे
रूपाली ठोंबरे पाटील यांनी ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ठाकरे यांच्या विभागनिहाय बैठका सुरू झाल्या. केसरीवाड्यातील बैठकीमध्ये ठाकरे यांनी “पक्षात कुणी असो-नसो, मला फरक पडत नाही, हा पक्ष कायम राहणार आहे,’ अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *