MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का?; अनिल परब म्हणतात…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अजूनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची डेडलाईनही संपली आहे. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही मेस्मा लावला जाऊ शकतो. आजच्या बैठकीत हा निर्णय होईल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मेस्माबाबतचा निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.

अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. निलंबित झालेल्या कामगारांवर कारवाई सुरू आहे. काही बडतर्फ झाले आहेत. या कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत असं त्यांना सांगितलं जात आहे. त्यामुळे कर्मचारी संपात आहेत. पण लोकांना वेठीस धरणं योग्य नाही. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून मेस्मा लावला जातो. या बाबतीत बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेऊ. मेस्मा कसा लावायचा किंवा आणखी काय करायचं ते पाहू. मेस्मा कुणाला लावायचा हे चर्चेअंतीच ठरवलं जाईल, असं परब म्हणाले.

सरकार निर्णय घेऊ शकत नाही
संपाचा तिढा कायम आहे. कामगारांसाठी ज्या गोष्टी करणं शक्य होतं ते सर्व केलं आहे. सर्वाधिक पगारवाढ दिली आहे. पगार वेळेत देण्याची हमी घेतली आहे. तरीही कामगार भरकटलेले आहेत. दिशाहीन झाले आहेत. त्यांना वाटतं ताबडतोब आपला निकाल लागेल. पण कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे सरकार निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही हे वारंवार सांगत आहोत. 20 तारखेला विलीनीकरण करून घेऊ असं त्यांचे वकील सांगत आहे. त्यामुळे हे कर्मचारी 20 तारखेपर्यंत कामावर येणार नसल्याचं कळत आहे, असं त्यांनी सांगितलं.

22 हजार कर्मचारी सेवेत
दरम्यान, कालही परब यांनी मीडियाशी संवाद साधताना पुन्हा एकदा सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. एसटीच्या सेवेत आतापर्यंत 22 हजार कर्मचारी परत आले आहेत. एसटीची 125 डेपोत वाहतूक सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात बऱ्यापैकी वाहतूक सुरू आहे. तर विदर्भ मराठवाड्यात कमी प्रमाणात वाहतूक सुरू आहे. 20 तारखेनंतर हळूहळू वाहतूक सुरू होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 20 तारखेला विलनीकरण करून दाखवतो अशी हमी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. कशाच्या जोरावर त्यांनी हमी दिली माहीत नाही. कोणत्या कायद्यांतर्गत दिली तेही माहीत नाही. परंतु कामगारांची दिशाभूल सुरू आहे. कामगार भरकटले आहेत. यात कामगार आणि एसटीचं नुकसान होत आहे. सदावर्तेंचं होत नाही. यात कामगार भरडले जात आहे. गेले दीड महिना ते कामावर नाहीत. त्यांचा पगार गेला आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *