महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ डिसेंबर । केंद्र सरकारचे काही निर्णय चुकले असतील मात्र सरकारचा हेतू स्वच्छ नव्हता असे कुणीही म्हणणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गेल्या सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार दिल्याचे शहा यांनी फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.
विकासाच्या प्रक्रियेत ६० कोटी नागरिकांना सहभागी करून घेणे हे सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचे शहा यांनी सांगितले. गेल्या सात वर्षांत भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण नाही. आम्ही अनेक निर्णय घेतले. त्यातील एखाद-दुसरा निर्णय चुकू शकतो मात्र आमचे अगदी टीकाकार देखील आमच्या हेतूबाबत शंका घेणार नाहीत, असे शहा यांनी नमूद केले.
अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले असून, स्वातंत्र्यानंतर विकासाच्या प्रक्रियेबाहेर जे ६० कोटी नागरिक होते. त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांची बँकांमध्ये खाती नव्हती, घरात वीज-गॅस जोडणीचा अभाव, आरोग्य सुविधांपासूनही हे नागरिक वंचित होते. मात्र मोदी सरकारने त्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास दृढ झाल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली देशाने करोना आटोक्यात आणल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. जम्मू व काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हिंसाचाराशिवाय हटवणे शक्य होईल याची कल्पना कुणी केली नव्हती. तसेच राम मंदिराचा वाद शांततेत सोडविल्याचे शहा यांनी सांगितले. देशाच्या आरोग्य व्यवस्थेतील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. ५० वर्षांत सरकारांनी चार ते पाच प्रमुख निर्णय घेतले, मात्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत किमान ५० महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे शहा यांनी सांगितले.