महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ डिसेंबर । ट्रॅफिक पोलिसांनी (Traffice Police) तुमच्या नावावर चुकून चलन (Wrong Challan) फाडलं किंवा तुमची काही चूक नसतानाही चलन फाडलं गेलं, तर घाबरून जाऊ नये. त्या चुकीच्या चलनाला आव्हान देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. चलन कॅन्सल (Challan Cancel) करण्यासाठी आधीपासूनच अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात ते सर्वांनाच माहिती असतात असं नाही. त्यामुळे ते माहिती करून घेणं आवश्यक असतं.
ओव्हर स्पीडिंग (Over Speeding) म्हणजेच मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणं, लाल सिग्नलला (Red Signal Jumping) न थांबणं, तसंच सिग्नलला योग्य रेषेच्या पुढे थांबणं हे ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन आहे. असं उल्लंघन कोणत्या वाहनांकडून केलं जातंय यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक शहरांत आता कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या संबंधित वाहनांच्या नंबरप्लेट्स कॅमेऱ्यांद्वारे आपोआपच वाचल्या जातात आणि त्या वाहनांच्या मालकांच्या नावे दंडाचं चलन जारी केलं जातं. अनेकदा असं होतं की, वाहनांच्या नंबरप्लेट्सवर चिखल उडालेला असतो किंवा नंबर चित्रविचित्र पद्धतीने लिहिलेला असतो. त्यामुळे कॅमेऱ्याद्वारे नंबरप्लेटचं रीडिंग योग्य प्रकारे होत नाही. साहजिकच दंडाचं चलन चुकीच्या नंबरवर फाडलं जातं.
चूक नसतानाही तुमच्या नावावर चलन फाडलं गेलं असेल, तर तुम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर (Helpline Number) कॉल करू शकता. तसंच, जवळच्या ट्रॅफिक पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती देऊ शकता. या दोन्ही ठिकाणी तुमची तक्रार ऐकली गेली नाही, तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. संबंधित चलन फाडण्यात ट्रॅफिक पोलीस यंत्रणेची चूक झाली आहे हे सिद्ध करता आलं, तर दंड भरावा लागत नाही.
स्कूटर, मोटरसायकल, कार, ट्रक अशा कोणत्याही प्रकारचं वाहन चालवत असताना कधी ना कधी चलन फाडलं जाऊ शकतं. चूक घडली असेल तर चलनावर आकारण्यात आलेला दंड भरण्याला काही पर्याय नाही. कारण वाहतूक योग्य प्रकारे चालावी यासाठी नियम केलेले असतात आणि नियमभंग केला तर दंड भरावा लागतोच; मात्र काहीही चूक नसताना चलन फाडलं गेलं तर सर्वांत आधी जवळच्या ट्रॅफिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याची तक्रार करायला हवी. तिथे जाऊन चलनाची तारीख आणि वेळ नेमकेपणाने सांगून, आपली काही चूक नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांना सांगावं. त्यांनी ते मान्य केलं, तर तिथूनच तुमचं चलन रद्द होऊ शकतं.
संबंधित व्यक्तीला याविरुद्ध कोर्टातही दाद मागता येते. आपण चलनाला आव्हान का दिलं आहे, आपली कोणतीही चूक नसून, गैरसमजामुळे ट्रॅफिक पोलिसांकडून चलन फाडलं गेलं आहे ही बाब कोर्टात सिद्ध करणं गरजेचं आहे. संबंधित व्यक्ती ते कोर्टात सिद्ध करू शकली, तर त्या चलनाची दंडाची रक्कम भरावी लागत नाही.
ई-मेलद्वारेही याबद्दलची तक्रार ट्रॅफिक पोलिसांकडे करता येते. ट्रॅफिक पोलिसांकडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चुकीचं चलन रद्द करता येतं. तसंच, अशा स्थितीत तक्रार कशी दाखल करायची, याबद्दल ट्रॅफिक पोलिसांकडून एक फॉरमॅटही सोशल मीडियावर शेअर केला जातो.