![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची बंगळुरूत विटंबना करण्यात आली. या संतापजनक घटनेमुळे सीमा भागातील मराठीजनांसह महाराष्ट्रात उद्रेक झाला आहे. बेळगावात गुरुवारी रात्री रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, दगडफेक झाली. 27 जणांना अटक करण्यात आली असून, दोन दिवस जमावबंदी जारी केली आहे. कोल्हापुरात शिवसैनिकांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला. कन्नडीगांविरोधात जोरदार आंदोलन केले. मिरजेत शिवसैनिकांनी आक्रमक निदर्शने करीत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
भाजपशासित कर्नाटकातील बंगळुरू येथील सदाशिवनगर परिसरातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना गुरुवारी रात्री समाजकंटकांनी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वत्र संतापाची तीक्र लाट उसळली. बेळगावसह सीमा भागातील मराठीजनांचा उद्रेक झाला. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगावात मराठी भाषिकांनी छत्रपती संभाजी महाराज चौकात रास्ता रोको आणि धरणे आंदोलन सुरू केले. समाजकंटकांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्याचा इशारा मराठी भाषिकांकडून देण्यात आला. यावेळी पोलीस वाहनांसह तीन ते चार ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष
बंगळूरूत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याची विटंबना आणि चित्रदुर्ग येथे कन्नडीगांनी भगवा ध्वज जाळला. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शनिवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार होते. पण कर्नाटक पोलिसांनी जमावबंदी लागू करून मराठी भाषिकांची धरपकड सुरू केल्याने निवेदन देणे आणि जिल्हाधिकारी भेट पुढे ढकलली. दरम्यान, रास्तारोको आणि धरणे आंदोलनानंतर कर्नाटक पोलिसांनी दहपशाही करीत 27 जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. या सर्वांच्या वतीने ऍड. महेश बिर्जे आणि ऍड. शंकर पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना डिवचण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा रातोरात हटविण्याचे पातक कानडी प्रशासनाने केले होते. यातच बेळगाव येथे सुरू असलेल्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करताना तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षणवेदिकच्या गुंडांनी, कानडी पोलीसांच्या बंदोबस्तातच काळी शाई फेकून, मराठी भाषिकांचा अवमान केला. याचे संतप्त पडसाद कोल्हापूरात उमटून शिवसैनिकांनी कन्नड रक्षण वेदिकेचा लाल-पिवळा ध्वज जाळून तीव्र निषेध नोंदवला.