ST Workers Strike: मुंबई हायकोर्टात संपावर सुनावणी, काय घडणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers Strike) पुकारलेल्या संप प्रकरणावर मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी, ठाकरे सरकार आणि प्रवाशांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीच्या निमित्तानं शेकडो एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती समोर आलीय.

आज उच्च न्यायालयात संपाबद्दल असलेल्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने ३ नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप अद्याप सुरूच आहे. उच्च न्यायालयाने एसटीच्या विलीनीकरणावर राज्य शासनाला समिती गठीत करण्याचे आदेश देऊन प्राथमिक अहवाल 20 डिसेंबर रोजी मागितला होता.

महाराष्ट्र सरकारनं हायकोर्टाच्या आदेशानं विनलीनीकरणासंदर्भात समिती स्थापन केली होती. आज या समितीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता, एचआरए वाढ, वेळेवर अशा मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपांची हाक दिली होती. त्यानंतर राज्य सरकारनं प्रथम महागाई भत्ता, एचआरएमध्ये वाढ केली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाहता राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ जाहीर केली. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात कामावर परतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार देखील करण्यात आला. मात्र, विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे.

महाराष्ट्र सरकारनं विलीनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने राज्याचे मुख्य सचिव, परिवहन विभागाचे सचिव आणि वित्त विभागाचे सचिव यांचा समावेश असणारी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने 12 आठवड्यात आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करायचा आहे.

एसटीला आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यासाठी सल्लागार म्हणून केपीएमजी या खासगी कंपनीची नियुक्ती सल्लागार म्हणून करण्यात आली आहे. केपीएमजी कंपनी त्यांचा अहवाल जानेवारी महिन्यात सादर करणार असून प्राथमिक अहवाल 16 डिसेंबर रोजी सादर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *