महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । महिला रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी असून महिलांना आता रेल्वेतही आरक्षित सीटची सुविधा मिळणार आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. महिलांना आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे प्रवास करताना महिलांना बसण्यासाठी बस आणि मेट्रोच्या धर्तीवर आरक्षित आसने उपलब्ध होणार आहेत.
बसमधून प्रवास करताना किंवा मेट्रोमधून प्रवास करताना महिलांसाठी आरक्षित सीटची सुविधा करण्यात येते. या आरक्षित आसनांमुळे गर्दीमध्ये त्यांचा प्रवास सुरक्षितपणे होतो तसेच प्रवासामध्ये त्यांना कोणतीही अडचण येत नाही. याच धर्तीवर आता रेल्वेतदेखील महिलांना आरक्षित आसने असणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये महिलांसाठी आरक्षित आसने असायला हवीत असा विचार सुरू झाला होता. आता त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे.