![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असतानाच त्याला आता महावितरणनेही हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विजेची मागणी कमी असताना रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक वाहनांना स्वस्तात वीज पुरवणार आहे. त्याचा प्रतियुनिटचा दर 4 रुपये 50 पैसे आहेत. घरगुती वीज ग्राहकांना पुरवल्या जाणाऱया विजेपेक्षाही हा दर कमी असल्याने इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विजेवरील वाहनांना चार्जिंगसाठी पुरवल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेचा दर 5 रुपये 50 पैसे एवढा निश्चित केला आहे. तसेच राज्यातील प्रमुख शहरांसह महामार्गांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सवलती दिल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर महावितरण मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रात 18 चार्जिंग स्टेशन उभारणार असून त्यापैकी मुंबईत 4, ठाण्यात 6, नवी मुंबईत 4 तर पनवेल परिसरात 4 स्टेशन असणार आहेत. त्यापैकी सात स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. ही सर्व चार्जिंग स्टेशन चोवीस तास सुरू असणार आहेत. दरम्यान, रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत विजेची मागणी कमी असल्याने इलेक्ट्रिक वाहनधारकांना सवलतीत वीज पुरवली जाणार असल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.