महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ डिसेंबर । राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज देखील विरोधकांनी सकाळीच पाऱ्यांवर निदर्शने केली. यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परबांनी एसटी संपाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे अनिल परब म्हणाले. तसेच एसटीच्या संपामुळे साडेसहा कोटींचे नुकसान झाले आहे. अशी माहिती अनिल परबांनी दिली.
आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक एसटी संपादरम्यान 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या वारसदारांना नोकरी देणार का? असा सवाल भाजप आमदार श्वेत महाल्लेंकडून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना परिवहन मंत्री परब म्हणाले की, ‘एसटीच्या 36 कर्मचारी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या वारसांना नोकरी देण्याविषयी सरकारची सकारात्मक भूमिका आहे. याविषयी माहिती घेतली जात आहे. आत्महत्या कशामुळे झाल्या? हे तपासणार जाणार असल्याचे देखील अनिल परब म्हणाले.
ज्या एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मदत द्यावी असा एक प्रश्न आहे. पण शासनाने बनवण्यात आलेल्या निषकांमध्ये बसणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. खरे म्हणजे जे निकष आहेत, त्यामध्ये जे कर्मचारी बसत नाहीत त्यांना काही मिळत नाही. पण असे असतानाही ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या थेट पगारात वाढ
सरकार या कामगारांच्या बाबतीत सहानुभुती विचार करत आहे. कर्मचाऱ्यांच्या थेट पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बाकीच्या राज्यांमध्ये जसे पगार आहेत. त्याच्या तोडीचे काहींपेक्षा जास्त पगार देण्यात आलेले आहेत. तरी देखील कर्मचारी विलिनीकरणाबाबत अडून आहेत. काही कामगार कामावर आले आहेत, काही आलेले नाही.
जसे कामगारांच्या बाबतीत सरकारचे दायित्व आहे. तसेच लोकांच्या बाबतीत देखील सरकारचे दायित्व आहे. आज ज्या लोकांना एसटीने प्रवास कारवा लागतो. त्यांचे शाळकरी आणि कॉलेजमध्ये जाणारी मुले ही एसटीपासून वंचित आहेत. आमची एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी आहे. ज्या यूनियनने संपाची नोटीस दिली होती. त्या यूनियनने देखील संप मागे घेतला आहे. या यूनियनचे नेतृत्त्व गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे करत होते. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी सांगितल्या प्रमाणे कर्मचाऱ्यांना विलिनीकरणाबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरीव वाढ देण्यात आलेली आहे.
सरकार चर्चेसाठी नेहमीच तयार आहे
एसटीच्या इतिहासात एवढी वाढ कधीच मिळालेली नव्हती.तरी देखील हा संपाचा मुद्दा समोर आहे. आज जवळपास 25 हजार कामगार रुजू झालेले आहेत. बाकीचे कामगारही रुजू होतील. सरकार चर्चेसाठी नेहमीच तयार आहे. आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याविषयी सरकार सकारात्मक आहे.