महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । राज्यात अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी २८ ते ३० डिसेंबर दरम्यान प्रवेश फेरी राबवण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपर्री चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार तीन फेऱ्या घेण्यात आल्या. या अंतर्गत बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून त्यांचे नियमित वर्गही सुरू झाले आहेत. मात्र मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती उपसंचालकांनी सादर केलेल्या यादीनुसार २७० विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळण्याची विनंती केली आहे. करोना परिस्थितीमुळे अनिश्चितता, माहिती वेळेत न मिळणे, पालकांचे स्थलांतर आदी कारणांमुळे प्रवेश मिळण्यास विलंब झाल्याची कारणे दर्शवण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देण्यासाठी २८ ते ३० डिसेंबर दरम्यान अखेरची प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उपसंचालक स्तरावरून रिक्त जागांचा तपशील विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्या सोयीचे महाविद्यालय प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा. या फेरीमध्ये ऑनलाइन प्रवेश क्षेत्रातून बाहेर जाणे, इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेणे याच कारणास्तव या फेरीत प्रवेश रद्द करता येईल.
प्रवेश फेरीचे वेळापत्रक
२८ डिसेंबर – नवीन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, शिक्षण उपसंचालक स्तरावरून विद्यार्थ्यांना रिक्त जागा दाखवणे, विद्यार्थ्यांची पसंती आणि रिक्त जागा तपासून प्रवेश देणे
२९ ते ३० डिसेंबर – विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
३० डिसेंबर – निश्चित केलेल्या प्रवेशांची माहिती संकेतस्थळावर नोंदवण्यासाठी शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अतिरिक्त वेळ