महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । महिनाभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील 108 देशात हातपाय पसरले आहेत. एक महिन्याच्या आतच या देशांमध्ये ओमिक्रॉनचे जवळपास दीड लाख रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा घातक नसला तरी देखील तो 70 पट अधिक संक्रमणकारक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबरला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर 108 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत या देशांमध्ये 1 लाख 51 हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नॉर्वे, कॅनडा, जर्मनी, दक्षिण आफ्रिका या देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.
भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 358 रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 144 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू व अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात पाऊले उचलण्यात आली आहेत.