महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यादरम्यान, विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकमेकांना काही मुद्द्यांवरुन धारेवर धरलं. दरम्यान, भाजपाच्या नितेश राणे यांनी काल आक्षेपार्ह पद्धतीने काढलेल्या ‘म्याव म्याव’चे पडसाद आज सभेत उमटले. यावरून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासह सर्वांची कानउघाडणी केली आहे. कोणीही कोणत्याही नेत्याची अशी नक्कल करु नये असे म्हणत त्यांनी खडसावले आहे.
अधिवेशन काळात प्रतिक्रिया देत असताना, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव करणारी शिवसेना असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत. यावरून शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी नितेश राणे यांच्या निलंबणाची मागणी केली होती. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेचा खरपूस समाचार घेतला आहे. कोणत्याच पक्षातील नेत्यांनी कुणाचीही नक्कल करु नये असे ते म्हणाले आहेत.