महाराष्ट्र २४- ऑनलाईन : स्वित्झर्लंड : जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस उष्णतेत मरतो का? तो कोणत्या वातावरणात जिंवत राहून पसरतो? या विषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. कोरोना व्हायरस उष्ण आणि दमट वातावरणात जगू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेने, कोरोनो व्हायरस उष्ण आणि दमट हवामान तसेच कोरडे आणि थंड हवामान असलेल्या देशांत जिवंत राहून पसरू शकतो, असे स्पष्ट केले आहे.
“तुम्ही जिथे रहात आहात, तिथले हवामान काहीही असले तरी काळजी घेणे महत्वाचे आहे,” असे ‘डब्ल्यूएचओ’च्या फिलिपीन्स शाखेने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. तुमचे हात वारंवार धूत रहा, शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा. शिंकल्यानंतर टिश्यू पेपर कचरापेटीत फेकून द्या आणि हात लगेच धुवा, असेही ‘डब्ल्यूएचओ’ने नमूद केले आहे.
पाणी आणि दारु पिल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होत असल्याच्या अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे की, पाणी पिणहे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. मात्र, यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखू शकत नाही. जर तुम्हाला ताप, खोकला आणि श्वासोश्वासास त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय उपचार घ्यावेत. आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांना तुमच्या प्रवासाविषयी माहिती द्या. मद्यपान सेवन करताना संयम ठेवला पाहिजे. आणि जे लोक मद्यपान करत नाहीत त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी मद्यपान करण्यास सुरुवात करू नये, असा सल्लाही ‘डब्ल्यूएचओ’ने दिला आहे.