राज्यात ऑक्सिजनची तिप्पट उपलब्धता – अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .3 जानेवारी । कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने (State Government) संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसऱ्या लाटेत जेवढा ऑक्सिजन (Oxygen) जितका लागला, त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

बारामतीत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच आम्ही सगळेजण आढावा घेत होतो. तिसरी लाट येईल असे गृहीत धरुन व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व साधे असे तिन्ही प्रकारचे बेड वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरवठा तिप्पट करण्याचे निर्देश दिले होते. आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण रुग्णालये मंजूर केली, त्यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. दुसरीकडे नगरपालिका, महानगरपालिकांच्या रुग्णालयातही व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन निधीपैकी तीस टक्के निधी या कामांसाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी आता प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्याचे निर्देश दिल्‍याचे अजित पवार यांनी सांगितले.

सिंधुदुर्गातील पराभव मान्य

सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले नाही. ज्यांना यश मिळाले त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी ही बँक चांगली चालवावी यासाठी शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रया अजित पवार यांनी दिली. अर्थमंत्री येऊनही निवडणुकीत फरक पडला नाही, या नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार म्हणाले, नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा त्यांनी केंद्रातून निधी आणावा.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपल्याशिवाय निवडणूका घेऊ नये, यावर सर्व राजकीय पक्षांचे एकमत आहे. जोपर्यंत प्रत्येक घटकाला त्याचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक होऊ नये. यासाठी न्यायालयात जाण्याचाही विचार करत आहेत. कोरोना रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढते आहे, त्याचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *