महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । करोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष स्वरूपात शाळांमध्ये जाणे अडचणीत आले आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाइन शाळांमध्ये पाठवावे की नाही, याबाबत पालकांच्या मनात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे.
डिसेंबरमध्ये अनेक शाळांना प्रत्यक्ष स्वरूपात प्रारंभ झाला होता. विद्यार्थीही चांगल्या संख्येने शाळेत जाऊ लागले होते. दरम्यानच्या काळात अनेक शाळांना ख्रिसमसच्या सुट्या लागल्या होत्या. आता, नवीन वर्षात शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, ओमायक्रॉनची धास्ती आणि करोनाबाधितांची वाढत जाणारी संख्या यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्यावर पालक फेरविचार करीत आहेत. लहान मुले शाळांमध्ये करोनाबाबतची काळजी घेऊ शकणार नाहीत, याची भीती पालकांमध्ये आहे. त्यामुळे शाळेत पाठविण्यापेक्षा पालक ऑनलाइनला पसंती देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा एकदा रोडावली आहे.
शाळांनीदेखील ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारचे वर्ग सुरू केले होते. विद्यार्थ्यांना ऑफलाइन शाळेत यायचे की नाही, याचा निर्णय पालकांना घेण्यास सांगितला आहे. काही शाळांनी पालकांकडून नव्याने संमतीपत्रे मागविली आहेत.