महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात उद्यापासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसलं तर त्या व्यक्तीकडून थेट 1000 रुपयांचा दंड घेतला जाईल, असं पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलं आहे. अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पुणे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं.
“मुंबई आणि पुण्यावर कोरोना संकट मोठ्या प्रमाणात आलं आहे. त्यामुळे पुण्यात आता उद्यापासून मास्क असेल तर 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकलात तर 1000 रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दोन्ही लस ज्याने घेतली नसेल तर कोणतीही हॉटेल, शासनाचे कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. एवढ्या दिवसांपासून आम्ही आवाहन करुनही काही लोकं राहिलेली आहे. कारण जे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यापैकी 36 जणांनी लसच घेतली नसल्याचं समोर आलं आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील दंडात्मक कारवाईबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. “मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय आज पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला असून 5 जानेवारी 2022 पासून याची अंमलबजावणी होत आहे”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
मास्क नसल्यास ५०० तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड !
मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय आज पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला असून ५ जानेवारी २०२२ पासून याची अंमलबजावणी होत आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 4, 2022