महाराष्ट्र २४- ऑनलाईन; पिंपरी-चिंचवड ;पिंपरी-चिंचवड शहरातील 8 डॉक्टर सहलीसाठी मॉस्कोला गेले होते. दिल्ली विमानतळावर परतल्यावर मंगळवारी (दि. 17) ते शहरात दाखल झाले. मात्र, पालिका प्रशासनाला कल्पना न देता ते आपले दैनंदिन व्यवहार करू लागले. पालिका प्रशासनाला ही माहिती कळल्यानंतर त्यांना तत्काळ होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यास संसर्ग वाढण्याची भीती आहे.
संबंधित डॉक्टर परदेशवारी करून आले असल्याची बाब बुधवारी (दि.18) पालिकेच्या अधिकार्यांना समजली. त्यांनी एका डॉक्टरांकडून सर्वांची माहिती मिळवली. त्यांचा शोध घेऊन त्या सर्व डॉक्टरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.दरम्यान, 36 डॉक्टरांचे एक पथक उझबेकिस्तानातील ताश्कंद येथे सहलीला गेले आहे. त्यात शहरातील 6 डॉक्टर आहेत. ते बुधवारी रात्री किंवा गुरुवारी दुपारपर्यंत शहरात दाखल होणार आहेत. त्या डॉक्टरांनी शहरात आल्यानंतर तत्काळ पालिका रुग्णालयाशी संपर्क साधण्याची ग्वाही दिली आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना घोषित केली आहे. कोरोना विषाणू तीव्र संसर्गजन्य असल्याने तातडीच्या सर्व खबरदारीच्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक केलेले आहे. त्यासाठी कोरोना विषाणूची लक्षणे आढळलेल्या संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन करून त्यापैकी तपासणीअंती ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांना तातडीने आयसोलेशन विभागात ठेवून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाव्यात.
पिंपरी-चिंचवड शहरात राहणारे जे नागरिक परदेशातून प्रवास करून पुणे, मुंबई व इतर विमानतळावरून शहरात दाखल होणार आहेत अशांना क्वॉरंटाईन करण्यासाठी त्यांनी पालिका रुग्णालयात नोंद करणे आवश्यक आहे. या नियमानुसार डॉक्टरांनी पालिका रुग्णालयात नोंद करणे गरजेचे होते. मात्र, संबंधित 8 डॉक्टरांनी तसे केले नाही, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.
संबंधित आठ डॉक्टरांपैकी कोणीही आजारी नसून, खबरदारी म्हणून त्यांना घरात क्वॉरंटाईन केले आहे. कोरोनाचे लक्षण आढळून आल्यास त्यांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविले जाईल.
– डॉ पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी