महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । सुली डिल्स, बुल्ली डिल्स या नावाने गिटहब या संकेतस्थळावरून महिलांची बदनामी करण्यात आली. सुली डिल्सबाबत नवी दिल्लीत अद्याप दोषारोपपत्रही सादर झाले नाही. त्याचप्रमाणे बुल्ली बाई डिल्सच्या माध्यमातून शेकडो मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात आली. हे प्रकार रोखण्यासाठी राज्याबरोबर केंद्र सरकारनेही पुढाकार घ्यावा. सायबर क्राइममधील तज्ञांच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय स्तरावर या विशिष्ट केसेससाठी विशेष एसआयटी टीम स्थापन करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महिलांच्या बदनामीप्रकरणी दिल्ली, हैदराबाद व मुंबईत महिला संघटनांच्या सदस्यांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या गेल्याची बाब डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निदर्शनास आणली. बुल्ली बाईप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही संशयितांनी ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्ती म्हणून महामहिम राष्ट्रपती यांनाही पत्र लिहून आरोपींवर कडक कारवाईसाठी विनंती केली आहे. महिलांसंदर्भात असे गुन्हे घडू लागल्याने ते रोखण्यासाठी कार्यवाहीबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या पत्रात सूचना केल्या आहेत.