टर्म इन्शुरन्स महागला; दोन वर्षात प्रिमियम ४० टक्क्यांनी वाढला, हे आहे कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । :विमा उद्योगाला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दाव्यांच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा थेट दबाव ग्राहकांवर पडत आहे. कारण रिइंश्योरन्स (पुनर्विमा) कंपन्यांनी प्रीमियम वाढवले आहेत. इंश्योरन्स अॅग्रीगेटर पॉलिसीएक्स.कॉम (PolicyX.com) च्या मते, २०२१ च्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये टर्म इंश्योरन्स प्राईस इंडेक्स व्हॅल्यूमध्ये ४.१८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत निर्देशांक मूल्य २३,९२९ रुपयांवर पोहोचले आहे. PolicyX.com ने अहवालात म्हटले आहे की, २०२१ च्या पहिल्या तिमाहीत आणि चौथ्या तिमाहीत टर्म इंडेक्स व्हॅल्यूमध्ये ९.७५ टक्के इतका मोठा फरक आहे.

२०२१ च्या चौथ्या तिमाहीत १ कोटी रुपयांच्या विम्याच्या रकमेचा सरासरी वार्षिक प्रीमियम ३०,७२० रुपयांवर पोहोचला आहे, जो तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबरमध्ये २९,४४३ रुपये होता. ५ पैकी ३ जीवन विमा कंपन्यांनी त्यांचे प्रीमियम वाढवले आहेत, ज्यात सर्वात मोठी वाढ १३.४ टक्के आहे. त्याच्या पाठोपाठ ४.९ टक्के आणि ०.९ टक्के वाढ झाली आहे. उर्वरित दोन कंपन्यांनी त्यांचे प्रीमियम स्थिर ठेवले आहेत.

मार्च २०२० पासून आतापर्यंत म्हणजेच जानेवारी २०२२ पर्यंत कंपन्यांनी टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये ४० टक्क्यांनी वाढ केल्याचे समोर आले आहे. सर्व खाजगी कंपन्यांनी टर्म इंश्योरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. आयसीआयसीआय (ICICI) प्रुडेन्शियल लाइफच्या टर्म प्लॅन्सचा प्रीमियम ३८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर एचडीएफसी (HDFC) लाइफ प्लॅनचा प्रीमियम ३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एलआयसी (LIC) ही एकमेव कंपनी आहे, जिने प्रिमियममध्ये कोणताही बदल केलेला नाही. एलआयसीच्या टर्म प्लॅनचे दर सलग तिसऱ्या वर्षी वाढलेले नाहीत.

दरम्यान, टर्म पॉलिसी खरेदी करण्यात १० वर्षांचा विलंब झाल्यास २५ वर्ष वयाच्या व्यक्तीला सरासरी ४८.९ टक्के जास्त खर्च करावा लागू शकतो. दुसरीकडे ३५ वर्षांच्या व्यक्तीला ७७.६ टक्के जास्त आणि ४५ वर्षांच्या व्यक्तीला ८०.८ टक्के जास्त खर्च करावा लागेल. तर धूम्रपान करणार्‍या पुरुषाला धूम्रपान न करणार्‍या पुरुषापेक्षा ५०.५ टक्के जास्त आणि धूम्रपान करणार्‍या महिलेला धूम्रपान न करणार्‍या महिलेपेक्षा ४९.५ टक्के जास्त पैसे द्यावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *