महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । मुंबईत 100 टक्क्यांच्या आसपास लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. मुंबईकरांमध्ये ऑण्टिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेन बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही. त्याचप्रमाणे रात्रीची संचारबंदी आणि वीकेण्ड लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली असली तरी निर्णय झालेला नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागातील ज्येष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीविषयीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. या वेळी ते म्हणाले, या बैठकीत शरद पवार यांनी सर्व उपाययोजनांची माहिती जाणून घेतली व काही सूचनाही केल्या. बुधवारी 25 हजार केसेस सापडल्या. उद्या कदाचित 35 हजार केसेस असू शकतील. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांशी चर्चा केली. सध्या घातलेल्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशा प्रकारची चर्चा करून शरद पवार यांनी आढावा घेतला.
मुंबई, पुणे, ठाण्यातील शाळा व महाविद्यालयेही बंद केली आहेत, पण शाळा-महाविद्यालये बंद केल्यानंतर या वयोगटातील तरुण-तरुणी मॉल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी करू लागले तर उद्देश साध्य होणार नाही याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. लसीकरण, औषध, निर्बंधांवर चर्चा झाली. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांमधील संख्येच्या मर्यादेची कठोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीत प्रामुख्याने झालेल्या चर्चेत लसीकरणाचा वेग वाढवण्यावर एकमत झाले. अजूनही 70 ते 80 लाख लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यांनी लस घेतलीच पाहिजे. एक लस घेतल्यानंतर दुसऱया लसीची तारीख उलटून गेल्यावरही अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. फ्रंटलाइन व हेल्थ वर्कर्स, सहव्याधी असलेल्या व्यक्ती व वयाची साठी पूर्ण केलेल्या ज्येष्टांना 10 जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे त्यावरही चर्चा झाली. खुद्द शरद पवारही तिसरा डोस घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.
तिसऱया लाटेमध्ये सध्या फुप्फुसापर्यंत हा संसर्ग पोहोचत नाही. केवळ घशापर्यंत संसर्ग मर्यादित आहे. घसा, नाकापर्यंत लक्षणे आढळतात. घशात खवखव, सर्दी होणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे टोपे म्हणाले.
लॉकडाऊन करण्याचा किंवा जिल्हाअंतर्गत प्रवासबंदीचाही सरकारचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अत्यावश्यक नसलेल्या सेवांमुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर त्यासाठी काही अधिक निर्बंध वाढवायची गरज भासली तर तेही घालावेत, यावर या बैठकीत चर्चा झाली, पण यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार शरद पवार हे दररोज सकाळी सात वाजता फोनवर बोलतात. कोरोना परिस्थितीवर एकमेकांशी अतिशय सविस्तर चर्चा करतात. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी या नेत्यांना सोपे होऊ शकते. म्हणून शरद पवार यांनी या बैठकीत अधिकची माहिती घेतली. निर्बंधांच्या संदर्भात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बैठक घेतली. आजही चर्चा झाली. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार हे एकत्र चर्चा करून घेतील. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करता येईल, असे राजेश टोपे म्हणाले.