राज्यात गरजेनुसार निर्बंध वाढवा : शरद पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ जानेवारी । कोरोना संसर्ग, रुग्णसंख्या, त्यातील वाढ आणि परिणामांची माहिती घेत खबरदारी म्हणून योग्य वेळी, योग्य निर्णय घ्यावा व गरज असेल तर निर्बंध वाढविण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी सांगितले.

लोकांची गर्दी आणि वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करताना राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबविण्याबाबत पवार यांनी बजावल्याचेही सांगण्यात आले. पवार यांच्या सूचनेनंतर आता राज्य सरकार तातडीने पावले उचलून उपाय करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी पवार यांची भेट घेतली. राज्यातील या आजाराची प्रमुख्याने रुग्णवाढीची कारणे, त्याचे प्रमाण, सरकारने केलेल्या उपाययोजना, सरकारी, खासगी रुग्णांतील उपचार व्यवस्था, संभाव्य निर्बंध आणि त्याची परिणामकारकता या बाबींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

तेव्हा, हा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या बाबी करण्याकडे पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले. परंतु, उपायांमुळे लोकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना पवार यांनी केल्याचे समजते.

पवार यांच्या भेटीतील चर्चेची माहिती टोपे यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘‘रुग्णसंख्येपासून रुग्णालये, मनुष्यबळ, औषधे आणि सध्याचे निर्बंध, त्याच्या अंमलबजावणीची माहिती घेतल्यानंतर यापुढच्या काळात आवश्यकता वाटली तर काही निर्बंध लागू करण्याची सूचना पवार यांनी केली आहे. लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याबाबत चर्चा झाली आहे.’’

मुंबईसह काही शहरांत रुग्ण वाढत असतानाच मुंबईत ‘कोरोनायोद्धांना संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. सध्याची स्थिती पाहता आरोग्य यंत्रणांकडे पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *