लवकरच 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार, येत्या 2 दिवसात तारखा जाहीर होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ जानेवारी । पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने नुकताच 4 राज्यांचा दौरा केला होता. तसेच मणिपूर राज्याचा देखील व्हर्च्युल माध्यमातून आढावा घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्र सरकारसोबत कोरोना स्थितीबाबत देखील चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच 5 राज्यांमध्ये निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्ष देखील कामाला लागल्याचे चित्र त्या राज्यांमध्ये दिसत आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये मतदार याद्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे सर्वजण निवडणुकीच्या तारखांची वाट बघत आहेत. दरम्यान, पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरूवारी निवडणूक आयोगाने या 5 राज्यांमधील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि अन्य आरोग्य क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने गृह सचिव अजय भल्ला यांच्याबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 2017 मध्ये विधनसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्याच्या तारखा या 4 डिसेंबर 2016 ला जाहीर केल्या होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या. उत्तर प्रदेशमधील 17 व्या विधानसभेचा कालावधी हा 15 मे पर्यंत आहेत. मागच्या वर्षाचा विचार केला तर यावेळी उत्तर प्रदेसमध्ये 8 टप्प्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये 3 टप्प्यात तर उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाची तिसरी लाट धडकल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशातही कोरोनाची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 17 हजार 100 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. भारतात मागील 24 तासांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3 लाख 71 हजार 63 झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळले आहेत. केवळ या तीन राज्यांमध्ये 60 टक्के नवे कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. अशातच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये प्रचाराला होणाऱ्या गर्दीमधून कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *